You can edit almost every page by Creating an account. Otherwise, see the FAQ.

गिरणीतले दिवस

From EverybodyWiki Bios & Wiki


गिरणीतले दिवस - विलास बेत

Giranitale Diwas - Vilas Bet

    सोलापूर या गावाबद्दल आणि त्याच्या जडणघडणीवर प्रकाश टाकणाऱ्या अल्प साहित्यापैकी एक लक्षवेधी लेखणी म्हणजे विलास बेत कृत 'गिरणीतले दिवस'.  गिरण गावातल्या घटनांचा हा संच केवळ सोलापूरकरापूरतेच मर्यादित राहत नसून ते या भूमीच्या आत्म्याचे, प्रतिभेचे, आणि कर्तृत्वाचे कवडसे पानापानात पाहायला मिळते.  विलास साहेबांनी पुस्तकाची सुरवात आणि शेवट पद्य शैलीत केल्याने वाचनास अधिकच रसाळ अनुभव आला.  मी स्वतः या गावचा असल्यामुळे मला इथल्या इतिहासाचे विलक्षण कुतूहल आहे.  त्या कुतूहलाची पूर्तता करण्याचे श्रेय या पुस्तकाला जातं.  श्री. बेत सरांनी माझ्यासारख्या किशोर वयीन वाचकाला अगदी सहजपणे कळेल अशा भाषेत लेखन केल्यामुळे गिरणगावचं चरित्र समजून घेताना किंचितही कंटाळा येत नाही.  सोलापुरातल्या गिरण्यांचा उदय, अस्त आणि प्रवास समजून घ्यायला मोठी मदत झाली.  प्रकरणातील प्रत्येक घटनेचे स्थळ आणि त्या घटनेशी जोडलेल्या व्यक्तींची कर्तृत्वे समजतात.  दरम्यान त्या ठिकाणांची प्रत्यक्ष प्रकाशचित्रे जसे, गिरणीची भव्य इमारत, टाईम ऑफिस, कँटीन, चिमणी, गिरणीतले मारुती मंदिर, गेट सभा इ.  पुस्तकात पाहायला मिळतील अशी अपेक्षा ठेवल्यास वाचकाची निराशा होते.  मात्र लेखणीतल्या आशय घनतेप्रमाणे शिरीष घाटे यांच्या रेखाचित्रांनी आणि मुखपृष्टाने हे पुस्तक सुबकरीत्या सजून आले आहे.  ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी वागणुकीवर आणि तत्कालीन परिस्थितीवर कठोर टिका करत ज्येष्ठ पत्रकार श्री. कुमार केतकर यांनी गिरणीतल्या दिवसांची प्रास्ताविक केली आहे.  दिडशेहून अधिक पृष्ठादरम्यानच्या घटना गिरणी, व्यवस्थान, अधिकारी, संघ आणि मिलचा प्राण असलेल्या कष्टकरी कामगार याभोवतीच गुंफली आहे.  गिरणी आणि गिरणगाव समजून देताना लेखकाने अगदी प्रत्येक गोष्टीचे बारकावे आमच्या पुढ्यात ठेवले.  मिलवर अवलंबून असणाऱ्या जीवांचे जगणे स्पष्टपणे समजून दिला आहे.  सरकारी आणि खासगी मालकीच्या कारखान्यातील फरक,  त्यामधील कामगारांची परिस्थिती, त्यांचे योगदान, त्यांचे मनोबल, त्यांची प्रतिक्रिया,  त्यांना मिळणारा मोबदला, त्यांचा दिनक्रम, त्यांचा आहार - विहार,  त्यांचे आचार - विचार, त्यांचे कडू - गोड अनुभव वाचताना ती चित्रे नजरेसमोर उभी राहतात आणि मनात कायमचे दडून जातात.
    पुस्तकाच्या प्रस्थावनेत सर्व बाजुंनी कामगारांची पिळवणूक करून गिरणी मालकांनी खूप पैसे कमावल्याचे वर्णिले आहे.  मुंबईची तत्कालीन सामाजिक परिस्थिती आणि मुडदूस अर्थव्यवस्था जाताजाता ‘असत्याचे प्रयोग’ या वर्तमान वास्तवा कडे बोट करतात.  दुसऱ्या प्रकरणात  गिरणगाव अशी ओळख सुरू होते.  अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात पाचही गिरण्यां कधी सुरू झाल्या?  त्या कोणच्या मालकीच्या? त्यामध्ये कार्यान्वित असणाऱ्या कामगारांची संख्या आणि उत्पादन क्षमतेविषयी सांगतात.  गिरणी सोबत चाळ संस्कृती कशी रूढ झाली?  गिरणगाव एक स्वयंभू व्यवस्था साकारताना दिसते.  मजुराला त्याचा पगार खूप प्रिय असतो त्याचं यथाचित्रण तिसऱ्या प्रकरणात समजते. परंतु मिळालेल्या मोबदल्याला किती विभाजने, परतावे त्यात दडलेले असतात! पगार हा केवळ क्षणिक असल्याचे मजुराच्या जीवनातून समजते. प्रकरण चारमध्ये मिल मधल्या कामगारांना समजून घेताना या प्रकरणातल्या काही व्यक्तिरेखा पाहायला मिळतात. ज्या माणसाचे आयुष्य केवळ गिरणी इतकेच असेल याची कल्पना करणेदेखील कठीण असताना अशी काही माणसं होती जी निवृत्तीनंतरसुद्धा गिरणीत यायची. यातून गिरणीप्रती त्यांची आपुलकी दिसून येते. मिल आणि मजुरांच्या भोवतालच्या जीवन अनेक बारीक-सारीक घटकांशी जुंपलेले आहे. पाचव्या प्रकरणात लेखक आपल्याला एका वृद्ध महिलेचा परिचय करून देतात. हि महिला जेवणाची व्यवस्था, इंग्रजी भाषेत केटरिंग सर्विस करायची. नियमित डबा पोहोचवताना दररोज एकाच वाटेने, एकाच क्रमाने तिची काम करण्याची पद्धत होती. त्यामुळे मिलमध्ये काम करणाऱ्या मजुरांची त्यांच्या घरच्यांची आणि इतर कर्मचाऱ्यांची नातं जोडले गेले. भोजन पोहोचवण्यासोबत तातडीचे निरोप इमर्जन्सी मेल सर्व्हीस पोहोचवण्याचे काम करीत असे अर्थात आपुलकीच्या भावनेने.
   प्रकरण सहामध्ये कामगारांच्या संस्कृतीत जीवनाला स्पर्श केलेला आहे.  लोकांमध्ये रूढ झालेल्या परंपरा, अंधश्रद्धा येथे दिसतात.  घाणीतल्या जनजीवनाचे चित्रित करते.  ते सुधारण्यासाठी गिरणीतून शिक्षण देणे अपेक्षित होते. परंतु ते साध्य करता न आल्याची खंत लेखक व्यक्त करतात.  बदली कामगार हा जुना शब्द आहे. नवी पिढी त्याला त्याला टेम्पोररी किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिस असा उच्चारतात.  त्या उलट कायम कामगार म्हणजेच पेरोल असे संबोधतात.  या दोन्ही कामगार वर्गात किती तफावत असते याचे वास्तव सांगणारे सातवे प्रकरण. काम मिळविण्याची धडपड, जेमतेम मिळणारा मोबदला, त्यातून जगणारे अस्थिरतेचे जीवन समजते. बदली कामगारांची मनस्थिती, कामाविषयी आस्था त्यांचे आरोग्य बऱ्याचअंशी नकारात्मकच असायचं.  लेखक नरसिंग गिरजी मीलमध्ये कामगार अधिकारी या पदावर कार्यरत असताना आलेला अनुभव आठव्या प्रकरणातून ते आपल्यासमोर ठेवतात.  गिरणीच्या अनेक वास्तूंपैकी ‘टाइम ऑफिस’ हे कामगारांच्या अधिक परिचयाचे तर त्यातून मदत करणारे मास्तर वर्ग त्याचा मोठा आधार असायचा.  कामगारांच्या शंकेचं निरसन, त्यांच्या तक्रारी, यासारखी अनेक अनुभव समजतात.  उत्पादकता वाढावी म्हणून गिरणीच काम तीन पाळ्यांमध्ये चालायचं. रातपाळीमध्ये उर्वरित दोन पाळ्यांच्या तुलनेत अनेक घटना घडताना दिसतात. कायम रात्रीच काम स्वीकारण्याच्या कामगारांची मानसिकता, मिलच्या साहित्याची होणारी चोरी उत्पादनात होणारी घट या विषयाचा घटनाक्रम रातपाळी या  नवव्या प्रकरणात पहावयास मिळतो.
   लेखकाने सन १९७७ ते १९८७ दरम्यान नरसिंग गिरजी मीलमध्ये कामगार कल्याण अधिकारी या पदावर नोकरी केली.  ही गिरणी सरकारी होती आणि उर्वरित सगळ्या गिरण्या खाजगी होत्या.  सरकारी असल्याने कायद्याचे अधिनियम लागू असायचे. मुंबई औद्योगिक संबंध कायद्याचे पडसाद दहाव्या प्रकरणात आपल्याला वाचायला मिळतात.  प्रकरण अकरा ते चौदामध्ये लेखकाने आपली कार्यालयीन भूमिकेचे प्रतिबिंब दाखवले आहे. आपल्या सेवेअंतर्गत पार पडलेल्या कर्तव्याचा परिचय आपल्याला करून देतात. एके दिवशी सायंकाळी कामावरून घरी परतताना एकाने त्यांच्यावर हल्ला केला सुदैवाने ते त्यात वाचले.  या घटनेनंतर लेखक आणि त्यांचे कुटुंब खूप घाबरले.  “गिरणी आता नको” या मतापर्यंत येउन पोहोचतात. त्याच्याबरोबर इतर कारणांचा उल्लेखही केला आहे.  एखाद्या कामगाराला गिरणीत काम करताना गंभीर दुखापत होऊन मृत्यू पावल्यावर कामगार अधिकाऱ्याची भूमिका आणि मर्यादा या घटनेतून दिसून आली आहे.  हा गिरणीचा अविभाज्य घटक आहे परंतु त्व ठिकाण मानले जायचे इतकी नकारात्मकता या जागेबाबत असलेली कारणे सदर प्रकरणात विस्तृतपणे दिली आहेत.
    कामगारवर्ग जेथे आहेत तेथे संघटना, जेथे संघटना तेथे चळवळ आलीच तसे समीकरण या प्रकरणात स्पष्ट दिसते. शासनचा कायदा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस सोलापूर, कामगार संघ आणि सोलापूर गिरणी कामगार युनियन यांच्या नात्याची आणि आंतरिक सहसंबंध येथे सजण्यास मदत होते.  अनेक व्यक्ती या समूहाच्या मुख्य पदावर असताना केलेली कामगिरी आणि घेतलेल्या निर्णयाची यथास्थिती प्रकरण पंधरा, सोळा आणि सतरा या प्रकरणात दर्शविली आहे. याच प्रकरणात एकंदर गिरणीबद्दलच्या नकारात्मक वाहणारे वारे वाचकाच्या मनात अधिक घन होत जातात. 
   गिरणीत कामगार यांची उपस्थिती खूपच महत्त्वाची असते कारण त्यावरच उत्पादन पूर्णपणे अवलंबून असायचं.  पण मीलला कमी उत्पादनाला सामोरे जावं लागत होते.  कामगारांची गैरहजेरी ही त्या वेळी गिरणी समोरची मोठी समस्या होती.  त्याला सुप्त कारणे देखील आहेत.  गैरहजेरीमागच्या कारणांचे मानसिक घालमेल प्रकरण अठरा व एकोणवीस सांगितले आहे.  इतकी सर्व नकारात्मकता जनमानसात घटित असताना नवतरुणांनी रोजगारासाठी गिरणीकडे येण्याची पसंती दाखवली नाही. अप्रेंटिसेस कायद्याअंतर्गत नवशिक्षित तरुणांना संधी मिळेल पण त्याच्याकडे केवळ तांत्रिक ज्ञान असायचे आणि सांघिक मूल्यांची कमतरता असायची.  सोलापूरला गिरणगाव अशी ओळख निर्माण करून देणाऱ्या सर्व गिरण्या इतिहासात नाव अजरामर केल्या आहेत. गिरणीची स्वतःची अशी ओळख होती. वैविध्यता व वैशिष्ट्य प्रकरण बावीस मध्ये दिसतं तर प्रकरण तेवीसमध्ये आपल्याला जुन्या गिरणीतील उत्पादित बद्दल माहिती मिळते. देशातील पहिली घटना दुरुस्ती जुनी गिरणीतून होते हे देशभरात पहिल्यांदा घडले ही बाब अधोरेखित करण्यासारखी आहे.
   प्रकरण तेविसावे हे अधिकच विशेष आहे कारण सोलापूरच्या गिरण्यांचा विषय जेव्हा येतो तेव्हा त्या गिरण्या बंद पडलेल्या मिलचा कामगार हा सर्वप्रथम ठळकपणे पुढे ठाकतो.  मागील वीसहून अधिक प्रकरणादरम्यान लहान-मोठ्या घटकातून, वातावरणातून व्यक्ती, कृती आणि सहसंबंध समजून दिले तर हे प्रकरण गिरण्यांची धोरणे, गिरण्या बंद होण्यास कारणीभूत घटक व तत्त्वे, मालकांचा गिरणी बंद करण्याकडे कल व त्यांच्या अडचणी सांगितल्या आहेत. दुसऱ्या बाजूला कामगारांमधील माणूस या व्यक्तीची हानी, त्याला उत्तम मार्गावर पोहोचवण्यात झालेली विफलता, व्यसनाधीनता, संस्कृतिक जाणीवेकडे दुर्लक्ष झाल्याने कामगाराची काळी प्रतिमा समाजात उमटली आणि तो अविरतपणे शोषणाचा बळी पडत गेला याचे सकारण आढावा सांगणारे हे अखेरचे प्रकरण वाचकांना पुन्हा एकदा मनस्वी विचार करायला भाग पाडते, अंतर्मुख करते.

पुस्तक परिचय करून देणारे - राघवेंद्र श्रीकृष्ण वंजारी.

पुस्तकाचे नाव - गिरणीतले दिवस

लेखक - विलास बेत

प्रकाशक - परिवर्तन अकादमी प्रकाशन, सोलापूर.

पृष्ठे - १६४

मूल्य - १८०/-

References[edit]


This article "गिरणीतले दिवस" is from Wikipedia. The list of its authors can be seen in its historical and/or the page Edithistory:गिरणीतले दिवस. Articles copied from Draft Namespace on Wikipedia could be seen on the Draft Namespace of Wikipedia and not main one.