Dr. Anil Nerurkar M.D. (America)
Script error: No such module "Draft topics". Script error: No such module "AfC topic".
वैयक्तिक परिचय
अनिल हे नेरूरकर कुटुंबातील सात अपत्यांपैकी एक. त्यांचे वडील श्री. शांताराम नेरूरकर हे प्रसिद्ध डॉक्टर होते तर आई एक प्रेमळ गृहिणी. १९४४ च्या ऑक्टोबरमध्ये मुंबईतील गिरगावात अनिल यांचा जन्म झाला. ग्रँटरोडच्या रॉबर्ट मनी टेक्निकल हायस्कुलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांच्या मनात सामाजिक बांधिलकीचे बीज रुजले ते शाळेतील वातावरणात. तेथील श्री. रांगणेकर आणि श्री. नाईक यांचा त्यांच्या मनावर खूप प्रभाव पडला. तल्लख बुद्धिमत्ता लाभलेल्या अनिल यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच डॉक्टर होण्याचा निश्चय केला. शालांत परीक्षेत भरघोस यश संपादन केल्यानंतर त्यांनी जीवशास्त्र हा मुख्य विषय घेत विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. इंटर सायन्सला अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी मुंबईतील के.इ.एम. रुग्णालयाच्या जी.एस. मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला. उत्तम विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्याची या कॉलेजची तेव्हाची परंपरा आजही चालू आहे. १९६९ मध्ये त्यांनी एम.बी.बी.एस. पूर्ण केले आणि पुढे स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र या विषयात एम.डी.ची पदवी संपादन केली. डॉक्टरांच्या मते के.इ.एम.मधील त्यांच्याबाबतीत घडलेली सर्वांत सुंदर गोष्ट म्हणजे मीना वझे हीच्याशी झालेली भेट जी पुढे त्यांची सहचारिणी झाली. पुढे वर्षभरासाठी अनिल यांनी टाटा हॉस्पिटलमध्ये काम केलं आणि मग तेव्हाच्या हुशार मुलाप्रमाणे अनिल आणि मीना दोघेही MRCP/MRCOGच्या शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. परीक्षा उत्तमप्रकारे पास झाल्यावर दोघांनी तेथेच नोकरी सुरू केली. चांगला अनुभव गाठीशी घेऊन मायदेशात परतण्याचे त्यांनी आधीच ठरवले होते. परदेशात स्थायिक होण्याचा विचार मनात नव्हता कारण मुंबईत, दादरमध्ये मीनाच्या वडिलांचे वझे हॉस्पिटल हे नावाजलेले प्रसूतिगृह होते. परत येऊन इथेच प्रॅक्टिस करण्याचा दोघांचा मानस होता. त्याकाळातील भारतातील अनेक डॉक्टर्स अमेरिकेत जाण्याची स्वप्नं पाहत. मात्र त्यासाठी ECFMG (Educational Commission for Foreign Medical Graduates examination) ही परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं असे. अनिल आणि मीना दोघेही बोलक्या आणि मोकळ्या स्वभावाचे असल्याने इंग्लंडमधल्या अनेक भारतीय डॉक्टरांशी त्यांची दोस्ती झाली होती. त्यांच्यापैकी बरेचजण ही ECFMG ची परीक्षा देत असत. आपलेही ज्ञान एकदा पडताळून पहावे यासाठी या दोघांनीही सहजच ही परीक्षा द्यायचे ठरवले. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्या ग्रूपमधील एकूण १२ जणांपैकी केवळ दोघे उत्तीर्ण झाले आणि ते होते अनिल आणि मीना !
अगदी अनपेक्षितपणे या दोघांच्या भाग्याची रेषा त्यांना अमेरिकेच्या वाटेवर घेऊन गेली. तिथे गेल्यावर पुन्हा दोघांना अमेरिकेमध्ये वैद्यकीय प्रॅक्टिस करण्यासाठी एका नवीन परीक्षेला सामोरे जावे लागले. दोघांसाठी हा काळ कसोटीचा होता. उच्चशिक्षित आणि संपन्न कौटुंबिक पार्श्वभूमी असली तरी या दोघांसाठी यशाचा मार्ग तितकासा सुरळीत नव्हता. डॉ. अनिल म्हणतात की अमेरिकन नागरिक तसे सरळ आणि मोकळे असतात. एकदा का त्यांना तुमच्याविषयी खात्री पटली की मग ते तुम्हाला खुल्या मनाने स्वीकारतात, मग तुमच्या त्वचेचा रंग आड येत नाही. नेरूरकर पतिपत्नींची तिथली वैद्यकीय कारकिर्द अतिशय यशस्वी आणि सुखासमाधानाची झाली.
पुढे अमेरिकेत स्थायिक झाल्यावर नेरूरकर कुटुंबाचं जीवन सर्वच दृष्टीने समृद्ध झालं. मुलांनी आपापल्या करियरमध्ये उत्तम यश संपादन केलं. सगळं काही मनासारखं होत होतं. माणसाला अजून काय हवं असतं? बहुतांश मध्यमवयीन माणसांसाठी ही वेळ निवांत होऊन आराम करण्याची असते. मात्र नेरूरकरांसाठी ही वेगळ्या पर्वाची सुरुवात होती, नव्याने कृतिशील होण्याची! ते वर्ष होतं २००८ !
डॉ. नेरूरकर हे प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहणं पसंत करतात, याबाबत विचारले असता ते म्हणाले, मी प्रसिद्धीच्या विरोधात आहे असं नाही. ऐकणाऱ्याच्या मनावर त्याचा योग्य परिणाम होईल किंवा त्याच्या कृतीत त्याचे पडसाद उमटतील अशी खात्री पटेल तिथेच मी माझ्या कामाबद्दल बोलतो. बाकीच्यांशी मला काहीही देणेघेणे नाही. मला नेहमीच असं वाटत आलंय की माझं मिशन मी थोडं उशिरा सुरू केलं. चाळीशी पंचेचाळीशीतही माझी आर्थिक आतासारखीच होती. तेव्हा जर मी या कामाला सुरुवात केली असती तर आतापर्यंत परिस्थितीत लक्षणीय बदल दिसला असता. आता मी तरुण राहिलेलो नाही. मनाच्या भराऱ्यांना शारीरिक क्षमता अडवते. भराऱ्यांना शारीरिक क्षमता अडवते. याच कारणासाठी मी वयाने तरुण असलेल्यांशी माझ्या कामाबाबत बोलतो. योग्य दिशा दाखवली तर हीच माणसं बदल घडवून आणतील, चमत्कार घडवून आणतील. गर्जे मराठीशी बोलण्यामागे माझा हाच उद्देश आहे की माझा दृष्टिकोन या माध्यमातून जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचावा.
मनाशी जिद्द बाळगून एखादी गोष्ट साध्य करायची ठरवल्यावर त्या निश्चयापासून हे दोघे जराही मागे हटत नाहीत. निष्णात स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून दोघेही अतिशय प्रसिद्ध ! उत्तम प्रॅक्टिसमुळे लक्ष्मीचाही वरदहस्त लाभलेला. परंतु समाजाचं देणं परत करावं या विचाराने अनिल यांना झपाटून टाकले. व्यवसायातले लक्ष थोडे कमी करून समाजकार्याकडे वळण्याचा त्यांचा निश्चय होत होता. मनाने ते कायमच सिंधुदुर्गात रमलेले असतात. आजही जेवढा काळ ते अमेरिकेत असतात, तेव्हा पुढच्या भारत दौऱ्यात कुडाळ आणि आजूबाजूच्या परिसरात करण्याच्या कामांची आखणी मनात चाललेलीच असते. समविचारी लोकांच्या ते नेहमी संपर्कात असतात. आपल्या कामात त्यांनीही सहभागी व्हावे यासाठी त्यांना प्रवृत्त करत असतात. डॉ. नेरूरकर म्हणतात, इथल्या अनेकांना भारतातील गरजू लोकांसाठी काहितरी करण्याची मनापासून इच्छा असते पण त्यासाठी स्वतःहून काही ठोस पावलं उचलणं सर्वांनाच जमतंच असं नाही. आपल्या करियरवर परिणाम होईल या काळजीपोटी अनेकजण पुरेसा वेळही देत नाहीत. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात ते अमेरिकेतील आपल्या मित्रमंडळातील सहा जोडप्यांना कुडाळभेटीला घेऊन आले आणि त्यांनाही इथल्या उपक्रमांमध्ये सामील करून घेतले. आपल्या समाजकार्यातील प्रवासात या कुटुंबांची साथ मिळावी हाच हेतू यामागे होता. वडके, फाटक, रानडे, देशपांडे, पै, हेबळे अशा या सुहृदांनी डॉक्टरांच्या या उदात्त कामाला मदत करण्याचे, आधार देण्याचे अर्थातच मान्य केले.
स्वतःचा शोध घ्यायचा असेल तर दुसऱ्याच्या सेवेत स्वःला विसरून जा! या महात्मा गांधीच्या विचारांचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ. अनिल नेरूरकर! जन्मभूमीच्या विशेषतः आपल्या पूर्वजांची नाळ जिथे जोडलेली आहे त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या आंतरिक ओढीने भारतात परतणाऱ्या डॉक्टरांना, इतरांना देण्यातला आणि त्यांची आयुष्यं फुलवण्यातला आनंद निश्चितच गवसला आहे.
कुटुंब
डॉ. मीना नेरूरकर म्हणजे स्त्रीरोगतज्ज्ञ, अभिनेत्री, दिग्दर्शिका, लेखिका, नाटककार, नृत्यांगना, नृत्यदिग्दर्शिका असं एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी एका आरोग्यविषयक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञ या नात्याने डॉ. मीना यांना विशेष आमंत्रण दिले होते.
अभिनेत्री या नात्याने त्या वन लाईफ टू लिव्ह या अमेरिकन टीव्हीवरील - ABC मालिकेतील कार्यक्रमात, इंग्लिश विंग्लिश' या बॉलिवुडच्या चित्रपटात, स्लिपवॉकर्स अनॉनिमस आणि डॉ. रवी एन्ड मि.हाईड या हॉलिवुडच्या चित्रपटात दिसल्या होत्या. सुंदरा मनामध्ये भरली या नृत्यनाट्याच्या दिग्दर्शनाबद्दल त्यांना मंगेशकर फौंडेशनतर्फे आदिशक्ती सन्मान तर जागतिक मराठी अकॅडमीतर्फे विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या लेखणीतून साकारलेली दोन पुस्तके महाराष्ट्र टाईम्सच्या टॉप १० पुस्तकांच्या यादीत समाविष्ट झाली होती. अवघा रंग एकचि झाला या नाटकासाठी त्यांना उत्कृष्ट नाटककाराला देण्यात येणारा अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आले.
त्यांचा मुलगा तेजस, अॅम्स्टरडॅममध्ये स्थायिक होऊन ऑप्टिमम आऊटपुट हा व्यवसाय सांभाळत आहे. नवनवीन कल्पनांचा शोध घेण्याच्या संकल्पनेतून या व्यवसायाची उभारणी झाली आहे. उद्योगांमध्ये नेहमी ज्या समस्यांना सामोरे जावे लागते त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने उत्पादन विकास आणि मार्गदर्शन असे त्याचे स्वरुप आहे. न्यूयॉर्क, न्युजर्सी, अम्स्टरडॅम आणि मुंबईमध्ये या कंपनीचा विस्तार आहे.
तेजसची पत्नी डच असून तिने इंटर्नल मेडिसिन या विषयात प्रावीण्य मिळवले आहे. अॅम्स्टरडॅम मध्ये याच क्षेत्रात ती कार्यरत आहे. नेरूरकर दांपत्याची कन्या अदिती हीदेखील डॉक्टर असून बॉस्टन येथे स्थायिक झाली आहे. हार्वर्ड विद्यापीठात ती विद्यार्थ्यांना इंटिग्रेटेड मेडिसिन या विषयाचे प्रशिक्षण देते.
डॉ. अनिल आणि डॉ. मीना यांच्या लग्नाला चार दशकं उलटली आहेत. जीवनाचे साथीदार आणि व्यावसायिक भागीदार असं हे समृद्ध नातं. पूर्णपणे भिन्न अशा त्यांच्या आवडीनिवडी आहेत. दोघांच्याही ध्येयामध्ये खरंतर मूलतः तफावत आहे. परंतु आपापल्या मार्गाने वाटचाल करतानाही एकमेकांना सर्व दृष्टीने पूरक ठरणारे हे अनोखे भावबंध.
References[edit]
This article "Dr. Anil Nerurkar M.D. (America)" is from Wikipedia. The list of its authors can be seen in its historical and/or the page Edithistory:Dr. Anil Nerurkar M.D. (America). Articles copied from Draft Namespace on Wikipedia could be seen on the Draft Namespace of Wikipedia and not main one.