You can edit almost every page by Creating an account. Otherwise, see the FAQ.

अॅड. गिरीश राऊत @ भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ

From EverybodyWiki Bios & Wiki

आॅस्ट्रेलियात जंगले जळत आहेत. यावेळच्या वणव्यांमधे ताज्या माहितीप्रमाणे सुमारे १०० कोटी प्राणिमात्रांची आहुती पडली आहे. हजारो इमारती जळत आहेत. माणसे मरत आहेत, स्थलांतर करत आहेत.

जंगलांची राख पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांत जात आहे. म्हणून शहरांनाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तापमान जागोजागी ५०°से वर जात आहे. वीजेची उपकरणे काम करत नाहीत. शहरांचा वीजपुरवठा बंद पडत आहे.

ही असाधारण परिस्थिती पृथ्वीच्या तापमानवाढीमुळे निर्माण झाली आहे. सन १७५६ सालात जेम्स वॅटचे वाफेचे इंजिन अवतरले. सुमारे ३०० कोटी वर्षांपासुन हरितद्रव्यरूपी सूक्ष्मजीवांनी, गेल्या ४५ कोटी वर्षांत भूमीवरील वनस्पतींतील हरितद्रव्याने व त्यापेक्षा जास्त काळ सागरातील वनस्पतींनी, प्रकाशसंश्लेषणाद्वारे शोषलेला, पृथ्वीच्या पोटात कोळसा, तेल व वायूरुपात साठलेला कार्बन, स्वयंचलित यंत्रांना ऊर्जा पुरवण्यासाठी, बाहेर काढून जाळला. या वेगाने वातावरणात गेलेल्या कार्बनच्या उष्णता शोषणाच्या गुणधर्मामुळे तापमानाच्या संदर्भात काळाचे चक्र उलट फिरवले गेले, हे या तापमानवाढीचे कारण आहे.

याच औद्योगिकरणात वस्तुनिर्मितीसाठी, वीजनिर्मिती सीमेंट स्टील इ. बांधकाम साहित्य, वाहननिर्मिती, रासायनिक यांत्रिक शेतीसाठी, लागणारी रसायने इ. खनिजांसाठी खाणी करून व रस्ते करून पृथ्वीवरील डोंगर त्यावरील जंगलांसह खणून काढले गेले. कार्बन शोषणारे हरितद्रव्याचे नैसर्गिक अविष्कार नष्ट करून शहरे उभी केली गेली. ठोक राष्ट्रीय उत्पादन वाढवणे म्हणजे प्रगती व विकास मानल्याने या प्रक्रियेत, वातावरणातील कार्बनमधे सतत वाढ होत गेली व हरितद्रव्याचा नाश होत राहिला.

पॅरिस करारात, मानवजात वाचवण्यासाठी रोखणे आवश्यक आहे, असे सांगितलेली, पृथ्वीच्या सरासरी तापमानातील २°से ची निर्णायक वाढ चालू वर्षी सन २०२० मधे होत आहे. सन २०१६ पर्यंत १.२ °से ची वाढ झाली होती. १६ पासुन प्रतिवर्षी ०.२०°सेची महाविस्फोटक वाढ सुरू झाली. ६ नोव्हेंबर २०१७ ला जागतिक हवामान संघटनेने तापमानवाढ परिवर्तनीय झाल्याची म्हणजे तापमान वाढत राहणार असल्याची अधिकृत घोषणा जर्मनीतील 'बाॅन' शहरात झालेल्या युनोच्या परिषदेत केली. खरेतर ही जगाला हादरवणारी व रूढ संकल्पना मोडून फेकण्यास सांगणारी घटना आहे. औद्योगिकरण चालू राहिल्यास मानवजात व जीवसृष्टी नष्ट होणार आहे , पण याची जाणीवही मानवजातीलाच नव्हे तर स्पेनची राजधानी "माद्रीद" मधे "काॅन्फरन्स आॅफ पार्टीज - २५" या परिषदेसाठी जमलेल्या राष्ट्रांच्या प्रतिनिधींना असल्याचे जाणवले नाही.

आपल्या देशातही अर्थमंत्री 'निर्मला सीतारामन' यांनी अर्थव्यवस्थेला उभारणी देण्यासाठी १०२ लाख कोटी रू. उतरवणार असल्याचे जाहीर केले. महाराष्ट्र सरकारही उद्योगपतींबरोबर हाच विचार करत आहे. यातुन भौतिक वस्तुनिर्मिती अधिक वेग घेईल. सन २०१८ मधील कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनात ८५% वाटा वाहनांचा व वीजनिर्मितीसाठी कोळसा जाळण्याचा आहे. ९% वाटा सीमेंट निर्माणाचा आहे. या ९४% शिवाय उरलेले उत्सर्जन इतर वस्तुनिर्मितीचे आहे. हे उत्सर्जन शून्य करण्याची गरज असताना प्रत्येक गुंतवणुक त्यात प्रचंड वाढ करणार आहे. आता औद्योगिक युगातील, "मेक इन...........", "........ इज अंडर कन्स्ट्रक्शन" आणि "स्टार्ट अप" अशा कल्पनांना सोडचिठी देण्यात यावी. पृथ्वी फक्त जीवन देण्यासाठी आहे. नोकरी देण्यासाठी नाही. ही गोष्ट या क्षणी समजली नाही तर लवकरच, "पृथ्वी जीवन देण्यासाठी होती", अशी स्थिती येईल व हे सांगायला आणि ऐकायला कुणी नसेल.

ही अस्तित्वासाठी आणिबाणी आहे. जगभर मोटारीचा त्याग करण्याची गरज आहे. कारण मोटारीचा उत्सर्जनात ४०% प्रत्यक्ष व मोटारीसाठी होणारी रस्ते निर्माण व खुद्द मोटार निर्मितीसह सुमारे ७५% वाटा आहे. मोटार ही 'शवपेटी' आहे असे म्हणण्यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. वीज व सीमेंटबाबतही हेच आहे. 'विकास' हा नैतिक, अध्यात्मिक, भावनिक, मानसिक, बौध्दीक असू शकतो. पण भौतिक नाही. प्रेम विश्वास ज्ञान सत्य तत्व व त्यांच्यावरील श्रद्धा यांच्या अभावामुळे भौतिक वस्तुंची आसक्ती तयार होते.

'उद्योगपती' हा माणुस म्हणून वेगळा व त्याचा उद्योग म्हणजे त्याची कृति वेगळी. हा माणुस म्हणुन हवा पाणी अन्नामुळे जगतो. त्याच्या उद्योगामुळे नाही. तीच गोष्ट त्यांच्या उदयोगातील कर्मचारी कामगारांबाबत आहे. कोणताही उद्योग आपल्याला कधीही जगवत नव्हता. उदरनिर्वाह पृथ्वी करत होती, उद्योग नव्हे. मोटार, सीमेंट, वीजनिर्मिती इ. सर्व उद्योग बंद झाले तर तुम्ही मरणार नाही. पण ते थोडा काळही चालू राहिले तर खचितच मराल.

अशी होती शेती… “शेती करा – औद्योगिकीकरण व शहरीकरण थांबवा!”

भारतीयांनी दहा हजार वर्षे उत्कृष्ट शेती केली. येथील निसर्गाच्या जडणघडणीला धरून शेतकऱ्यांनी अन्नाची सुलभता, विपुलता व विविधता निर्माण केली.

ब्रिटिशांनी भारतीयांना रासायनिक शेती शिकविण्यासाठी तेथील सुवर्णपदक विजेते रासायनिक शेती तज्ज्ञ डॉ. सर अल्बर्ट हॉवर्ड यांना सन १८९५मध्ये भारतात पाठवले. हॉवर्ड हे कोपर्निकस, ब्रुनो व गॅलिलिओ या शास्त्रज्ञांच्या परंपरेतले खरे शास्त्रज्ञ होते. त्यांना भारतीयांच्या शेतीविषयी कुतूहल होते. त्यांनी ठरवले की, प्रथम भारतात फिरून हा कृषिप्रधान देश हजारो वर्षे शेती कशी करतो ते पाहू. ते पाच वर्षे भारतात विविध ठिकाणी फिरून शेती समजून घेत होते.

ते त्यांच्या “अॅन अॅग्रिकल्चरल टेस्टामेंट” या ग्रंथात म्हणतात, “भारतीय शेतकरी माझे गुरू आहेत. त्यांच्याकडून मी शिकलो, की निसर्ग हा खरा शेतकरी आहे. एकाच खाचरात जमिनीचा कस वाढता ठेवून हजारो वर्षे शेती करणे भारतीयांकडून शिकावे. ते मिश्र व फिरती पिके घेतात. या पद्धतीची जाण आम्हां ब्रिटिशांना एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत, सन १८८९पर्यंत नव्हती.”

हॉवर्ड पुढे लिहितात “रसायन हे खत नसून विष आहे, ते पिकांचे अन्न नाही.” हा ग्रंथ म्हणजे ज्ञानाचे भांडार आहे. आजही तो शेतीविषयक प्रमाणभूत मानला जातो. हॉवर्ड यांचे भाकीत की, “यंत्राची भूक पृथ्वी भागवू शकणार नाही,” हे आज खरे ठरले आहे.

ब्रिटिश राजवट येईपर्यंत भारतात ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी’, अशी स्थिती होती. मात्र ब्रिटन व इतर युरोपियनांची साम्राज्ये ही मूलतः वेगळ्या बैठकीवर आधारित होती. ती बैठक होती यंत्राची. यंत्रामुळे होणाऱ्या लाखो, करोडो वस्तूंच्या उत्पादनामुळे तंत्रज्ञानाची. या अमर्याद वस्तू-उत्पादनाला ग्राहक हवा, बाजारपेठ हवी होती. यामुळे व्यापार मुख्य झाला. भारतात राज्य करणारी ‘ईस्ट इंडिया’ ही कंपनी होती. या व्यापारावर उभारलेल्या साम्राज्याला, बाजारपेठ म्हणजे शहरे निर्माण होणे हवे होते. परंतु, भारतीय शेती हा त्यातील मुख्य अडथळा होता. शाश्वत अन्न देऊ शकणारी तिची क्षमता, तिने निर्माण केलेली समाधानावर साधेपणावर व शहाणपणावर आधारलेली जीवनपद्धती हा अर्थव्यवस्थेसाठी अडथळा होता. कारण, या देशात उत्पादक शेतकरी हाच उपभोक्ता होता. तो स्वावलंबी होता ही औद्योगिकीकरण व शहरीकरणासाठी समस्या होती. अशा स्थितीत बाजार निर्माण होत नाही.

म्हणून मोठ्या पगाराचे आमिष देणाऱ्या नोकऱ्या ब्रिटिशांनी तयार केल्या. शेतकरी व शेती मोडली जाईल अशी धोरणे राबवली. कसेही करुन शेती सोडून शहरांकडे स्थलांतर करण्यास शेतीत सामावलेल्यांना भाग पाडले. त्यातून उत्तम व्यापार, मध्यम नोकरी व कनिष्ठ शेती अशी नवी व्यवस्था निर्माण झाली.

डॉ. अल्बर्ट हॉवर्ड यांनी वनस्पती व प्राणी यांच्या कुजण्यातून ‘ह्युमस’ निर्मितीतून अनेक पिकांबाबत शेती उत्पादनात काही पट वाढ करून दाखवली होती. त्यांचा वरील ग्रंथ सन १९४०मध्ये प्रथम लंडनमध्ये प्रकाशित झाला होता. सन १९५६पर्यंत त्याच्या सात आवृत्त्याही निघाल्या होत्या. त्यांनी यंत्र व रसायनांचा शेतीत प्रवेश करण्यातील धोका दाखवला असूनही स्वतंत्र भारतात स्वामिनाथनसारख्या कुठलीही प्रतिभा नसलेल्या, कंपन्यांच्या शेतीतील हितसंबंधाचा पुरस्कार करणाऱ्या, स्वतः शेती न करणाऱ्या सुमार माणसाच्या नावाचे वलय निर्माण केले गेले. भारतीय शेतकऱ्यांचे व शेतीचे वाटोळे करण्याचे ब्रिटिशांना न जमलेले काम या स्वामिनाथनांनी करून दाखवले. करोडो भारतीयांना विषारी अन्नाव्दारे कॅन्सर, हृदयविकार व इतर व्याधी देऊन यमसदनाला पाठविण्याचे महापाप यांनी केले. ‘स्वामिनाथन’ हे स्वत: जणू एक औद्योगिक, कृत्रिम उत्पादन आहेत. ही भारतीयांत रुजलेली पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणारी एक दांभिक प्रवृत्ती आहे.

भारतीयांना कायमचे गुलाम बनवण्याचे मेकॉलेचे उद्दिष्ट यामुळे पूर्ण झाले. भारतात ब्रिटिशांना हवी तशी माणसे शिक्षणाने घडवली व स्वातंत्र्यानंतरही ब्रिटिश अंमल अशा प्रकारे चालू राहिला.

गांधीजी म्हणत की, ‘मेकॉलेच्या शिक्षणाने भारतीयांच्या गुलामगिरीचा पाया घातला.’ युद्धात स्फोंटकांच्या निर्मितीसाठी रसायने बनवणाऱ्या कारखान्यांना युद्धानंतर काम नसे व या रसायनांचे करायचे काय? हा प्रश्न होता. ती रसायने शेतीत खत म्हणून आणली गेली. यातून एनकेपी (नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस) खतांचा भडिमार झाला. हे औद्योगिकीकरणासाठी शेतीला वापरणे होते. रासायनिक खतांना गंधकाम्लाचा (सल्फ्युरिक अॅसिड) पाया असतो. त्यामुळे जमिनीतील जीवाणू, गांडुळे मृत झाली. रासायनिक खतांच्या वापरास मूळ पिके प्रतिसाद देईनात. ती खाली पडू लागली. म्हणून, पृथ्वीवरील जैविक विविधतेचा भाग म्हणून अस्तित्वात असलेल्या, परंतु काड व पानांचा अभाव म्हणून वापरात नसलेल्या, मेक्सिकोतील गहू व थायलंडमधील तांदळाच्या मूळ बुटक्या वाणांचा संकर करून गहू व तांदळाच्या नव्या खुज्या जाती आणल्या.

यामुळे बियाणांची स्वयंपूर्णता नष्ट झाली. शेतकरी पूर्वी बियाणे विकत नव्हता, ते फक्त दिले-घेतले जात होते. बियाण्यांना व एकूणच शेतीला पावित्र्य होते. जमीन काळी आई होती. गायीगुरे घरच्या माणसांप्रमाणे होती. निसर्ग, ईश्वर हे देतोय ही जाणीव होती. स्वामिनाथन नव्हे, तर कंपनी पुरस्कृत, हरितक्रांती, या फसव्या नावाच्या शेतीमुळे शेती संस्कृती मोडली. औद्योगिकीकरणामुळे सर्व गोष्टींचे वस्तुकरण करण्याची वृत्ती शेतकऱ्यांत आली. यामुळे काही काळ, काही शेतकऱ्यांना सुबत्ता आल्याचे दिसले. पण या प्रक्रियेत खरा शेतकरी मेला. तथाकथित हरितक्रांतीने हजारो वर्षे नसलेला घटक म्हणजे उत्पादन खर्चाला जन्म दिला.

आधी सर्व कार्य निसर्ग करत होता. तो पाऊस पाडत होता, बियाणे तोच देत होता. पावसाळ्यातील टिकलेल्या ओलाव्यावर व दवावर रब्बीची पिके येत होती. फक्त श्रमाची गरज होती. गाई, गुरे, गोमूत्र व शेणखत इ. देत होती. दूध देत होती. गुरे चरणात चरत होती. कोंबड्या होत्या, बकऱ्या होत्या. शेतांभोवतीच्या जंगलात मध, फळे, कंदमुळे इत्यादी विनाशुल्क उपलब्ध होती. उन्हाळ्यात भोपळा, कलिंगड व इतर वेली वाढत होत्या. पावसात खेकडे व इतर खाद्य मिळत होते. झरे, नद्या वाहत होत्या. विहिरी पाण्याने तुडुंब भरलेल्या होत्या. खाड्या, सागरांत विपुल मत्स्यसृष्टी होती. हवा शुद्ध होती. हे असे हजारो वर्षे होते. याला औद्योगिकीकरणाची, शहरीकरणाची, अर्थव्यवस्थेची, विकासाची दृष्ट लागली.

गांधीजी म्हणत की, “भारतातील प्रत्येक शेत ही एक प्रयोगशाळा आहे व प्रत्येक शेतकरी हा शास्त्रज्ञ.” आता जमीन माती परीक्षणाच्या प्रयोगशाळा निघाल्या आहेत व वेळोवेळी माती परीक्षण करण्याचा सल्ला दिला जातो. शिक्षण घेतलेल्या नव्या पिढीची मानसिकता यासाठी घडवली जाते. हे जणू आईची परीक्षा घेण्यासारखे आहे. ज्या मातीने करोडो वर्षे सृष्टी प्रसवली, तिची सर्जनक्षमता तपासायची यांना गरजच काय? माती निर्जीवच मुळी यांच्या तंत्रज्ञानाच्या लादण्यामुळे झाली. जंगलाला कुणी खत देत नाही. पाणी देत नाही. नांगरणी करत नाही. तरीही जंगल करोडो वर्षे आहे. आजही जंगलाकडून बोध घेतला, तर या आपत्तीतून सुटका होऊ शकते.

शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याची गरज नाही. मात्र मग पैशांमागे धावणेदेखील थांबले पाहिजे. असा पैशामागे धावणारा समाज असलेली शहरे ही चूक आहे हे समजून घेतले पाहिजे. विदर्भासारख्या फक्त ४०० ते ६०० मि.मी. पाऊस पडणाऱ्या क्षेत्रातही घनदाट जंगल होते. ही जंगलाची क्षमता गळणाऱ्या पानांच्या, वनस्पतींच्या व प्राणी- पक्ष्यांच्या अवशेषांच्या व उत्सर्जनाच्या जमिनीवर सतत निर्माण होणाऱ्या थरामुळे, आच्छादनामुळे आहे. त्याचे विघटन करून पचवणाऱ्या जीवाणू व गांडुळांमुळे आहे. त्यांनी झाडांना पुरवलेल्या पोषक द्रव्यांमुळे आहे. जमीन सच्छिद्र केल्यामुळे पाणी व हवा खेळल्यामुळे, निचरा करण्यामुळे आहे.

या नव्या संकरित जाती व रासायनिक खतांमुळे तात्कालिक वाढलेल्या उत्पादनाचे गाजर शेतकऱ्यांना दाखवले गेले. परंतु याचे दुष्परिणाम नंतर समजणार होते. ५० वर्षांपूर्वी याचे व्यसन लावण्यासाठी बियाणे व खते फुकट दिली गेली.

संकरित बियाण्यांमध्ये किडीला तोंड देण्याची क्षमता नव्हती. शिवाय तणे जास्त उंच ठरू लागली. मग कीटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके बनवणाऱ्या कंपन्या वाढीस लागल्या. तण, कीटक, बुरशीने रसायनांना तोंड देण्याची क्षमता वाढवली की, अधिकाधिक विषारी रसायने शेतात ओतण्यात आली. एक दुष्टचक्र सुरू झाले.

पराशर ऋषींनी २,००० वर्षांपूर्वी म्हटले की, ‘जंतुनाम् जीवनम् कृषि:’. कृषि हे सजीवांच्या, जीव-जीवाणूंच्या जगण्याचे रूप आहे. हे जीवाणू व गांडुळे जमिनीत सच्छिद्रता ठेवत होते. हवा खेळवत होते. मूळांना प्राणवायू देत होते. पाण्याचा निचरा करत होते. मुख्य म्हणजे वरील थरात पडणारा पालापाचोळा व इतर सेंद्रिय पदार्थांचे विघटन करून त्यांना वनस्पतींना योग्य अशा अन्नात बदल घडवत होते. हा जीव-जीवाणू गांडुळांचा दुवा हरित क्रांतीने नष्ट झाला.

रासायनिक खतांना तिप्पट वा चौपट पाणी लागत होते. त्यामुळे नद्या अडवणारी धरणे बांधली गेली. तरीही पाणी कमी म्हणून बोअरवेल खणल्या गेल्या. भूजलाचा उपसा वाढत गेला. रसायनांमुळे सर्वच कीटक नष्ट होत गेले. विषारी रसायने शिरलेल्या अळ्यांना खाऊन पक्षी मेले. जमिनीतील सच्छिद्रता संपल्याने ती टणक झाली. मग ट्रॅक्टर वापरले जाऊ लागले. गाई-गुरे निरुपयोगी ठरू लागली. त्यांच्या शेणाची, खताची व नांगरणीची गरज संपली असे मानले गेले. बुटक्या वाणांमुळे काड, पाने कमी झाली. त्याचा चारा, जमिनीत खत होणे, जळण म्हणून उपयोग होणे थांबले.

जंगलांची क्षमता सर्वांत वरच्या पालापाचोळा व अवशेषांच्या कुजत असलेल्या मातीच्या थराने बाष्पीभवन थांबवण्यामध्ये आहे. निसर्गाचे चक्राकार संतुलन राखण्यात आहे. जैविक नियंत्रणात आहे. स्वतःचे थंड वातावरण निर्माण करण्यात आहे. अधिक गुंतागुंतीच्या, तरीही सुनियोजित विलक्षण अद्भूत कार्यपद्धतीमध्ये आहे. त्याचे आकलन अबोध सजीवांना व आदिम जमातींना आहे. म्हणून वादळे, पाऊस, भूकंप, त्सुनामी इत्यादींचा मागोवा त्यांना आधी लागतो. परंतु, स्वतःला बुद्धीवान म्हणवणाऱ्या शिक्षित मानवाला याचे ज्ञान नाही. माणसाने या आधुनिक बनण्याच्या चुकीच्या प्रक्रियेत अनेक नैसर्गिक क्षमता गमावल्या आहेत.

आपण फक्त दहा ते बारा हजार वर्षांपूर्वी जंगल सोडले आणि अगदीच थोड्या, म्हणजे सुमारे ५० ते २५० वर्षांत जंगल आपणांस जगवते हे भानही सोडले. जीवनाच्या ३९० कोटी वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात हा नगण्य काळ आहे. वस्तूंचे जग निर्माण करून औद्योगिकीकरणाने, आपले अस्तित्व ज्याचा भाग आहे व ज्यावर अवलंबून आहे, त्या खऱ्या नैसर्गिक जगाशी उभा दावा मांडला. हे मानवजातीने स्वतःला नष्ट करून घेणे आहे.

भारतात फक्त १०० वर्षांपूर्वी भाताच्या दोन लाख जाती होत्या. अनेक प्रांतांत तर खाचरागणीक वेगळी जात होती. ही निसर्गाची व त्याचा आदर करणार्‍या कल्पक भारतीय शेतकऱ्यांची किमया होती. शेतकरी हजारो वर्षे भुकेसाठी अन्न पिकवत होते. जसे की, ते इतर प्राणिमात्रांसाठी असते. मात्र, हरित क्रांतीने बाजारासाठी धान्य पिकवण्याची कल्पना रुजवली. त्यातून दुप्पट, तिप्पट उत्पादनाद्वारे मोठे उत्पन्न मिळवण्याची इच्छा आली. पूर्वी अन्न उत्पादन हा हेतू होता. आता पैशांचे उत्पन्न हा हेतू बनला. हे हवा व पाण्याप्रमाणे असलेली अन्न ही मूलभूत गरज भागवण्यासाठी नव्हते. उलट, असा शहरी समाज वाढवला जात आहे, जो हवा, पाणी व अन्न एव्हढ्याच इतर प्राणिमात्रांप्रमाणे आपल्या गरजा आहेत हे विसरून गेला आहे. त्या सहज भागत असल्याने कृत्रिमरीत्या उद्योगातून बनलेल्या असंख्य वस्तू चलनाद्वारे मिळविण्याच्या मागे लागला आहे. त्याला ‘आधुनिक जीवनशैली’ असे गोंडस नाव दिले आहे. हा उदरनिर्वाह नाही. कार, टीव्ही, संगणक, मोबाइल, इ. वस्तुनिर्वाह आहे. मात्र, यांना जगवणारा, मूलभूत गरज असलेले अन्न पिकवणारे शेतकरी मात्र यांच्या एखाद्या महिन्याच्या पगारापेक्षाही कमी रकमेचे कर्ज फेडू न शकल्याने आत्महत्या करू लागले. अशी विषम बेगडी व्यवस्था बदलण्याचा तो प्रयत्न करत नाही. समाजदेखील ही खोटी, अन्यायकारक, अशाश्वत व्यवस्था बंद करू असे म्हणत नाही. कर्जमाफी, खत, वीज, पाणी, बियाणे घरे इ. फुकट किंवा सवलतीच्या दरात मिळविण्यासाठी मागण्या होत आहेत. मरत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी तर हवीच. परंतु खते, वीज, पाणी, बियाणी कशाला? यामुळे तो पुन्हा औद्योगिकीकरणाने निर्माण केलेल्या सापळ्यात अडकतो. यापूर्वी हजारो वर्षांत त्याने अशा मागण्या त्या वेळच्या सत्ताधारी राजांकडे केल्या नव्हत्या. तो स्वावलंबी, स्वतंत्र होता. तोच राजा होता. त्याच्या गावांच्या स्वयंपूर्णतेमुळे भारतात स्वराज्य होतेच.

उंबरगाव, देहरीचे भास्कर सावे सन १९५५ पासुन नैसर्गिक शेती करून सतत विक्रमी पिके घेत आले. त्यांनी सरकारला व स्वामीनाथनना जीवघेणी 'रासायनिक - यांत्रिक' शेती थांबवण्यास परोपरीने सांगितले. पण आंतरराष्ट्रीय आर्थिक सूत्रधारांनी तसे घडू दिले नाही. जपानच्या मासानोबू फुकुओकांनी निसर्गात हस्तक्षेप न करता भरघोस पिके घेणारी "नाॅन डुईंग" शेती पध्दती यशस्वी रित्या दाखवली. कुणीही "one straw revolution" मराठीत "एका काडातुन क्रांती" वाचावे. स्वतःच्या कॅन्सरमुळे नैसर्गिक जीवनाकडे वळलेल्या विनिन परेरांचे "TENDING THE EARTH" वाचावे. सर डाॅ. अल्बर्ट हाॅवर्ड यांचे "AN AGRICULTURAL TESTAMENT" वाचावे.

आजरा, कोल्हापूरच्या मोहन देशपांडेंनी "ऋषि कृषि" पध्दतीने सर्वोत्तम पिके घेतली. असे हजारो शेतकरी घेत आहेत. मी स्वतः आहे. तुम्ही, 'झोपलेल्या माणसाला जागं करू शकता, पण झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही' .


सैबेरियाच्या पूर्वेकडील याकुत्स्क प्रांताजवळील भागात सुमारे १८००० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेला प्राणी बर्फ वितळल्याने सापडला. हा प्राणी कुत्रा व लांडगा या दोन्हींचा पूर्वज असण्याची शक्यता वाटते.

पृथ्वीवरील बर्फाचे आवरण झपाटय़ाने वितळत आहे. कधीकाळी बर्फात गाडले गेलेले मृत गिर्यारोहकांचे देहदेखील चांगल्या अवस्थेत सापडत आहेत. मात्र बर्फाखाली हजारो वर्षे सुप्तावस्थेत राहिलेले जिवाणू, विषाणूही बाहेर पडत आहेत. त्यात अनेक धोकादायक आहेत.

बर्फाचे आवरण ऐतिहासिक तापमानवाढीमुळे वितळत आहे. आॅस्ट्रेलियातील सिडनी शहरालगत अभूतपूर्व वणवे लागत आहेत. यावर्षी त्यांच्या तीव्रतेमुळे सिडनी शहराला धोका निर्माण झाला आहे.

या वणव्यांमधे जीवसृष्टी जळत आहे. चेहऱ्यावर मिश्किल भाव असलेले कोआला ह्या जातीचे हजारो प्राणीदेखील यात जळून मेले.

याच काळात जर्मनीत बर्लिन शहरातील प्राणिसंग्रहालयात चिनी पांडा जातीच्या अस्वलाच्या दोन गोंडस पिलांचे नामकरण झाले. "दीर्घकाळ वाट पाहिलेले स्वप्न" आणि "स्वप्न सत्यात उतरले" अशी या पांडा बाळांची नावे.

पृथ्वीवरून जीवसृष्टीचे उच्चाटन होत आहे. अशा आणिबाणीच्या वेळी स्पेनची राजधानी माद्रीद येथे युनोची महत्वाची पर्यावरण परिषद वाढत्या कार्बन उत्सर्जनाबाबत कोणताही ठोस निर्णय न होता दि. १३ डिसेंबर रोजी संपली. अशावेळी प्राणिसंग्रहालयातील पिल्लांचे कौतुक करावे हे ठीक आहे पण पृथ्वीवर प्रत्यक्ष निसर्गात, वाढत्या उष्म्यामुळे लागलेल्या आगीत जळणाऱ्या किंवा ध्रुवांवरील बर्फ वितळल्याने कायमच्या अस्तंगत होणाऱ्या अक्षरशः लाखो जीवजातींना वाचवण्यासाठी काही केले जात नाही.

जीवसृष्टी काही मानवाने निर्माण केलेल्या प्राणिसंग्रहालयात राहत नाही. झू आणि बोटॅनिकल गार्डन सारख्या प्रतिकात्मक गोष्टींत शहरी माणसे अडकली आहेत. खरे तर शहरे हीच माणुस नावाच्या अनैसर्गिक जगणाऱ्या प्राण्याची संग्रहालये आहेत. आपण पृथ्वीवर आहोत आणि आपलेदेखील उच्चाटन सुरू झाले आहे याचे त्यांना भान नाही.

आता या क्षणी थांबलो नाही तर मानवजात व जीवसृष्टी वाचणार नाही अशा अवस्थेत पोचलो तरी तेल कोळसा वायू (अणुऊर्जा देखील) जाळला जातच आहे. पॅरिसमधील आंतरराष्ट्रीय ऊर्जा यंत्रणा ( International energy agency ) मानवजातीचे नव्हे तर खनिज इंधनाचे हितसंबंध जपत नाणारसारख्या प्रकल्पांना व एकूण ऊर्जावापराला प्रगती व विकासाच्या नावे प्रोत्साहन देतच आहे. माद्रीदची परिषद त्यामुळेच अयशस्वी झाली.

लोक हतबल होऊन म्हणतात सामान्य माणुस काय करू शकतो? लक्षात घ्या, पृथ्वीवरील काही हजार उद्योगपती, राजकारणी, नोकरशहा व बँकरसाठी काही मोटार वीज, सीमेंट, स्टील, टीव्ही इ. चे कारखाने काढले गेले नाहीत. कोट्यावधी सामान्य माणसांना जगण्याच्या नव्हे तर चुकीच्या जगण्याच्या शैलीमधे आणले गेले तेव्हाच हे शक्य झाले.

म्हणून सामान्य माणसेच मानवजात व जीवसृष्टी वाचवण्याचे असामान्य काम करू शकतात. यासाठी त्यांना कुणा सरकार, उद्योगपती वा काॅर्पोरेटसशी लढायचे नाही. त्यांना लढायचे आहे आपल्याच मनाच्या, आपल्या इंद्रियांद्वारे भागवल्या जाणाऱ्या इच्छांशी, वासनांशी, संग्रहवृत्तीशी, प्रतिष्ठेच्या ( स्टेटस) खुळचट कल्पनांशी व अहंकाराशी. आपल्या मुलाबाळांच्या अस्तित्वासाठी हे करूया. कार्बन उत्सर्जन थांबवणाऱ्या व हरितद्रव्य वाढू देणाऱ्या ऊर्जाविरहित कृषियुगात परत जाऊया. तोच एकमेव उपाय आहे.

सिडनी | चार महिन्यांपासून लागलेल्या भीषण आगीमुळे ऑस्ट्रेलिया सध्या चांगलाच चर्चेत आहे. अशातच पाणीग्रस्त दक्षिण ऑस्ट्रेलियात जास्त पाणी पितात म्हणून 10 हजारांहून अधिक उंटांना गोळ्या घालून ठार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एका इंग्रजी माध्यमाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

उंट मानवी वस्तीत येऊन पाण्याचा साठा संपवत आहेत, अशी तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत होती. याची दखल घेत संबंधित विभागाने व्यायसायिक शुटर्संना उंटांना गोळा घालण्याचे आदेश दिले होते. या शुटर्संनी हॅलिकॉपटरमधून गोळ्या घालत 10 हजारहून अधिक उंटांना ठार केले आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या जंगलात महाभयानक आग लागली आहे. या आगीत 50 कोटींहून अधिक प्राण्यांनी आपला जीव गमावला आहे. अशातच मानव स्वत:च्या हाताने उंटांना संपवत असल्याने संताप आणि चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, उंट हा वाळवंटात राहणारा प्राणी आहे. तो अनेक दिवस पाण्याशिवाय राहू शकतो. तसेच उंट मोठ्या प्रमाणात मिथेन वायू उत्सर्जित करत असल्याने वातावरणात ओझोन वायूचे प्रमाण वाढत असते. भौतिक दृष्टीने स्वतःला आधुनिक म्हणवणारा माणुस हा खरेतर मूर्ख व वेडसर आहे. तो पूर्ण विनाशाकडे वाटचाल करत आहे.

वणवे लागतात, पाणी संपतेय ते तापमानवाढीमुळे. त्याला जबाबदार प्रगती विकासाच्या कल्पना आहेत. ते थांबवायचे सोडून ज्यांना जगण्याचा आपल्याइतकाच अधिकार आहे त्या उंटांना मारताहेत. ही अक्षम्य गुन्हेगारी आहे.


This article "अॅड. गिरीश राऊत @ भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ" is from Wikipedia. The list of its authors can be seen in its historical and/or the page Edithistory:अॅड. गिरीश राऊत @ भारतीय जीवन व पृथ्वीरक्षण चळवळ. Articles copied from Draft Namespace on Wikipedia could be seen on the Draft Namespace of Wikipedia and not main one.